मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्ष मिळून सत्तास्थापन करणार असून, नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची चिंता करू नका. त्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात २५ वर्षे राहावा अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या सुरू असलेल्या हालचालींवर त्यांनी भाष्य केलं. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. नवं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याच्या हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल,’ असं राऊत म्हणाले.
नव्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे असेल का असं विचारलं असता राऊत म्हणाले, ‘फक्त पाच वर्षांचा विचार का करता? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात २५ वर्षे राहावा अशी आमची इच्छा आहे. शिवसेनाच महाराष्ट्राच्या सत्तेत कायम राहणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा पुन्हा येईन, असे म्हणणार नसल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला.