नवी दिल्ली: यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मोदी आणि बॅनर्जी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा झाली. अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी मोदींची भेट घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली आहे.
यापूर्वी बॅनर्जी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भाजपाने त्यांच्यावर डाव्या विचारांचे असल्याचे आरोप केले होते.
अभिजीत बॅनर्जी हे एक असे अर्थतज्ज्ञ आहेत ज्यांनी काँग्रेसला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘न्याय योजना’ हा वचननामा तयार करण्यासाठी मदत केली होती. या योजनेद्वारे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरीब जनतेला किमान वेतन सहाय्याची घोषणा केली होती.