कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हुकूमशहा दक्षिण कोरियात गेला!
भूतकाळातील चुका पुन्हा घडणार नाही : हुकूमशहा किम जोंग
सेऊल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाच्या भूमीत जाऊन राष्ट्राध्यक्ष मून जई इन यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांच्या युद्धानंतर आणि शांतता विरामानंतर तब्बल 65 वर्षांनी कोरियांचे राष्ट्रप्रमुख एकमेकांना भेटले. कोरिया स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच भेट ऐतिहासिक ठरली आहे. भूतकाळातील चुका पुन्हा घडणार नाहीत, अशी ग्वाही किम जोंग उन यांनी कोरियन जनतेला दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन युद्धखोर राष्ट्रांत समेट घडविण्याच्या प्रयत्नशील असतानाच हे सकारात्मक पाऊल उचलले गेल्याने ही भेट अमेरिकेच्या रणनीतीचा भाग असल्याची चर्चा रंगली होती. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी सीमेवरील असैन्य क्षेत्रात एकमेकांशी हस्तांदोलन केले व शांती घर (पीस हाऊस) येथे शांतता चर्चा केली. ही भेट जगभरासाठी आश्चर्यजनक ठरली. गेल्या 65 वर्षांपासूनचे कोरियन युद्ध आजपासून समाप्त झाले असून, यापुढे दोन्ही देश एकमेकांच्या विकासासाठी प्रयत्न करतील, अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी याप्रसंगी केली.
65 वर्षांचे कोरियन युद्ध समाप्तीची घोषणा
उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणून ओळखल्या जाणार्या पॅनमूनजोम याठिकाणी शुक्रवारी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या रेषेच्या एका बाजूला उत्तर कोरियाची तर दुसर्या बाजूला दक्षिण कोरियाची भूमी असल्यामुळे हा भाग दोन्ही देशांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. याठिकाणी सकाळी किम जोंग उन याने प्रथम दक्षिण कोरियाच्या भूमीत येऊन मून यांची भेट घेतली. तसेच त्यानंतर मून यांना उत्तर कोरियाच्या भूमीत नेऊन त्याठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यावेळी माध्यमांनीदेखील मोठ्या उत्साहाने या ऐतिहासिक क्षणाचे चित्रण केले. यानंतर किम आणि मून हे या दोघांमध्ये काही वेळासाठी चर्चा झाली. यामध्ये कोरियन द्वीपकल्पामध्ये शांतता प्रस्थापित करणे, दोन्ही देशांचा विकास, त्यांची मैत्री आणि अणु चाचण्या याविषयी चर्चा करण्यात आली. याला दोन्ही नेत्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले कोरियन युद्ध आज समाप्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन्ही नेत्याकडून याठिकाणी एका वृक्षाचे रोपदेखील लावण्यात आले. तसेच या पुढे परस्परांच्या विकासासाठी एकमेकांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी एकमेकांना दिलेे. या भेटीला जूनमध्ये होणार्या किम जोंग आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बैठकीच्या प्रस्तावाच्या रूपात पाहिले जात आहे.
अमेरिकेने मानले चीनचे आभार
या चर्चेचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिले आहे. माझे मित्र शी जिनपिंग यांच्या मदतीशिवाय ही गोष्ट होणे अशक्य होते. त्यामुळे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विसरले जाऊ शकत नाही. शी यांनी पुढाकार घेऊन उत्तर कोरियाशी चर्चा केली आणि त्यानंतरच या दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच शी यांचे यासाठी कौतुकदेखील त्यांनी केले आहे.