पणजी : इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका, लोकांचे मत वेगळे आणि मशिन्सचे मत वेगळे होण्याची पूर्ण शक्यता असल्याने मतदान मतपत्रिकेद्वारे घेतले जावे किंवा व्हीव्हीपीटीमधील मतांची सोबत करुन ती टॅली केली जावी, अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पणजीत केली. दोनापावला येथील इंटरनेशनल सेंटरमध्ये सिटिझन्स फॉर डेमॉक्रोसी या संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अघोषित आणीबाणी
देशात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचा आरोपही माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आणि मोदी सरकारवर चौफेर टीका केली. इव्हीएमचे मत आणि लोकांचे मत हे सारखे असेलच हे सांगता येत नाही. काही ठिकाणी घेण्यात आलेल्या चाचणीत १० पैकी८ मते ही भाजपच्या बाजूने गेल्याचे आढळून आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा आपला आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पावर चर्चा नाही
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवसात कपात करण्याचे काम या सरकारने केले असून हा प्रकार दुर्दैवी असल्याची टिप्पणी त्यांनी केली. पूर्वी तीन दिवस सामान्य अर्थसंकल्पावर तर ३ दिवस रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा केली जात होती. आता दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केल्यानंतर दोन्ही अर्थसंकल्पांना मिळून दीड दिवसच दिला जातो. त्यातही चर्चा होवू दिली जात नाही. यावेळी अण्णाद्रमुक पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाज का चालू दिले नाही असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक असल्याचे सांगताना अण्णाद्रमुक हा भाजपाशी जवळीक असलेला पक्ष असून हे हेतूपुरस्सर सरकारपक्षाकडूनच केले जाते असा आरोपही त्यांनी केला.
लोक सावध होत नाही हे दुर्दैव
देशाचा आर्थिक विकास हा खुंटला गेला आहे. सरकारकडून चुकीचे आकडे दाखविले जात आहेत. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून तो चुकीच्या पद्धतीने चुकीचा दर दाखविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊनही देशातील लोक सावध होत नसेल तर ते दुर्दैवी आहे.
देशात अत्यंत वाईट परिस्थिती असून दलित, अल्पसंख्याक, शेतकरी व कामगार वर्ग दहशतीच्या छायेत असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. मन की बात ऐवजी त्यांनी दिल की बात लोकांसमोर मांडत सरकारचे काही चुकत असेल तर त्याचा फीड बॅक सरकार पर्यंत पोचवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.