जळगाव : श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या थकबाकीपोटी जिल्हा बँकेने बजावलेली नोटीस ही राजकीय दबावातुन दिली असल्याचा आरोप बँकेचे संचालक अॅड. रवींद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. जिल्हा बँकेने संचालक तथा श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांना 4 कोटी 25 लाख रूपयांच्या थकबाकीपोटी नोटीस बजावली. महिनाभरात ही थकबाकी भरण्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात बँकेचे संचालक अॅड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, मी जिल्हा बँकेचा संचालक आहे. नोटीस देण्यापूर्वी त्यांनी कळवायला हवे होते. राजकीय दबावातुन ही नोटीस दिल्याचे वाटत आहे. मुळात 2003 ते 2006 पर्यंत बँकेच्या ताळेबंदात संस्थानचे कुठेही नाव नाही, थकबाकी नाही, मग आता नोटीस कशी बजावली गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जिल्हा बँकेने निरंक दाखला दिला असुन तो माझ्याकडे आजही आहे. मध्यंतरीच्या काळात उपसा सिंचन योजनांचे कर्ज आणि व्याज माफ झाले. त्यात संत मुक्ताबाई संस्थानचेही नाव होते. त्यामुळे व्याज देखिल माफ झाले आहे. माझे वडील स्व. प्रल्हादराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या माध्यमातुन पॉलीटेक्नीक कॉलेज उभारण्यात आले होते. मात्र धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही राजकारण करून या संस्थानला बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपही अॅड. रवींद्र पाटील यांनी केला. अद्यापपर्यंत नोटीस मला प्राप्त झाली नसुन नोटीस मिळाल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे समन्वयक विकास पवार, संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मिनल पाटील, शहराध्यक्षा ममता सोनवणे आदी उपस्थित होते.