मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असून , राज्यात सत्तेचा डावपेच तसाच आहे. राज्यात विधानसभेची मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक आहे. शिवसेनेने प्रस्ताव द्यावा, मुख्यमंत्रिपदाबाबत भारतीय जनता पक्षाची तयारी आहे, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले असले तरी देखील भाजपचेहे म्हणणे शिवसेनेने फेटाळून लावले आहे. आता कोणताही प्रस्ताव येणार नाही, किंवा जाणार नाही, लोकसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलंय तेच होणार, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
भारतीय जनता पक्षाला आता कोणताही प्रस्ताव दिला जाणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचे शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटी घेत असून राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा, अशी मागणी शेतकरी त्यांच्याकडे करत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांदरम्यान सत्तावाटपाचा मुख्यमंत्रिपदासह ५०, ५० फॉर्म्युला ठरलेला होता, याचा संजय राऊत यांनी पुनरुच्चार करत नव्या प्रस्तावाचा मुद्दा फेटाळून लावला. जे ठरलंय तेच पुढे घेऊन जा, असे आवाहन राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला केले आहे. मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरल्यानंतरच राज्यात शिवसेना-भाजप युती झाली आणि विधानसभेची निवडणूक लढवली गेली. राज्यातील शेतकरी शिवसेनेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, याकडे राऊत यांनी पुन्हा लक्ष वेधले आहे.