आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळणार

0

नवी दिल्ली । व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात येणार असून इतर काही नवीन फिचर्सही व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यात येणार आहेत. तशी घोषणाच सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणार्‍या मार्क झुकेरबर्गने केली आहे.

फेसबुक एफ-8 च्या पत्रकार परिषदेत मार्क झुकेरबर्गने अनेक घोषणा करून व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा झुकेरबर्गने त्याच्या कीनोटमध्ये केली. कंपनीने नंतर एका ब्लॉग पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मेसेंजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच स्टिकर्सचीही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स फिचरचा जगभरातील जवळपास 450 मिलियनपेक्षाही अधिक ग्राहक वापर करत असल्याचे झुकेरबर्गने आपल्या भाषणात नमूद केले. तसेच अलिकडेच लाँच केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपचा जगभरातील 3 मिलियन लोकही वापर करत असल्याचेही झुकरबर्ग म्हणाला. क्लिअर हिस्ट्री आणि फेसबुक अ‍ॅपमध्ये डेटिंग प्रोफाइल सारख्या फिचर्सचीही घोषणा यावेळी करण्यात आली.