नागव्या मानसिकतेवर प्रहार करणारा ‘न्यूड’!

0

आपली संस्कृती ही सर्वसमावेशक मानली जाते. मात्र काही टुकार जुनाट संकल्पना आणि परंपरेमुळे कलेला विरोध करण्याची संस्कृती देखील भारतात जोरदार पद्धतीने रुजत चालल्याचे चित्र आहे. आपल्या धर्म, जाती, परंपरांच्या चुकांवर बोट ठेवणारे सिनेमे किंवा कलाकृती येऊ लागल्या असं दिसलं कि वेगवेगळ्या संघटना आणि संस्था त्या कलाकृतीच्या विरोधात करणी-भानामती करायला लगेच रस्त्यावर उतरतात. मराठी सिनेमाला एक विशिष्ट दर्जा देण्यात यशस्वी ठरलेले दिग्दर्शक रवी जाधव यांच्या न्यूड सिनेमाबद्दलही असच काहीसं घडलं. ‘न्यूड’ ला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) ऐनवेळी काढण्यात आले. यांनतर केवळ नावावरून बराच वादंग उठला. अनेकांनी विरोध केला तर काहीजण समर्थनार्थही उभे राहिले. सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र दिल्यानंतर २७ एप्रिलला हा अनकट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सुरुवातीलाच सांगतोय नागवेपण पाहणाऱ्याच्या नजरेत असतंय, असे अनेक विचारवंत सांगून गेलेत. बाळाला दुध पाजणाऱ्या आईच्या स्तनाकडे बघून जर कुणाची नियत खराब होत असेल तर ती प्रवृत्ती ही न्यूडला विरोध करणारी प्रवृत्ती आहे, असे समजावे. रवी जाधवांचा न्यूड हा सिनेमा अगदी त्या दुध पाजणाऱ्या आईचे वात्सल्य आणि दुध पिणाऱ्या बाळाची निरागसता आहे. नग्नतेसारखा संवेदनशील विषय असतानाही, त्यांनी तो कुठेही भडक होऊ दिलेला नाही. सिनेमाच्या नावाला आणि त्यातील विषयालाही विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी जर आधी हा सिनेमा पाहिला असता, तर कदाचित त्यांनाही प्रश्न पडला असता, की नेमका विरोध कशाला करायचा? कारण त्यांना अपेक्षित असलेली नग्नता इथे अगदी काडीचीही दिसून येत नाही आणि शेवटाला सन्न करून लावलेली थोबाडीत ही त्या तमाम संस्कृतीरक्षकांच्या थोडाबात लगावली की काय असच वाटून जातंय. एखाद्या स्त्रीकडे पाहणाऱ्या पुरुषांच्या भेदक नजरा आणि त्याच स्त्रीकडे किंबहुना नग्न स्त्रीकडे एका कलाकाराची कलेच्या उपासनेसाठी रोखलेली नजर यात असणारा फरक इथे लक्षात येतोय. सिनेमात नग्नतेला खरतर एक कला म्हणून दाखविलेय. न्यूडमध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर तो आपल्या समाजात पूर्वापारपासून चालत आलेला पुरुषी विकृत दृष्टीकोन. या विकृत सरंजामी पुरुषी वृत्तीवर सिनेमातून प्रहार केलाय.

चित्रकला महाविद्यालयांमध्ये किंवा कला संस्थांमध्ये माणसाचं न्यूड पोर्ट्रेट काढता येणं हा कलाशिक्षणाचा महत्त्वाचा भाग असतो. यासाठी स्त्री किंवा पुरुष मॉडेलना समोर बसवून अनेक विद्यार्थी हे पोर्ट्रेट काढत असतात. चित्रकलेच्या दुनियेशी संबंध असलेल्या लोकांना याविषयी अधिक माहिती आहे. असं नग्न मॉडेल म्हणून बसण्यासाठी संबंधित संस्थेकडून मोबदला मिळतो. जगभरात आणि भारतातही गेली कित्येक वर्षं ही प्रथा आहे. पूर्वी आणि आताही या कामासाठी सहजी माणसं मिळत नसत. विशेषतः स्त्रियांसाठी हे कठीण. न्यूड हा शब्द सर्वसामान्यांना काहीसा दचकवणारा असला, तरी कलाजगतात हाच शब्द प्रचलित असल्यानं सिनेमाचं शीर्षक म्हणूनही लक्षवेधक आहे. या सिनेमातही अशाच दोन न्यूड मॉडेल्स असलेल्या महिलांची कहाणीय. यमुना (कल्याणी मुळे) आणि चंद्राक्का (छाया कदम) या दोन समाजाकडून पिचलेल्या महिलांची कथा. दोघींचं भावविश्व वेगळं. कहाण्या वेगळ्या. नवऱ्याच्या पुरुषी विकृतीला कंटाळून साधीभोळी यमुना मुंबईसारख्या महानगरात येते. तिथ राकट आणि कणखर असलेली चंद्राक्का तिला सहारा देते. पोराच शिक्षण व्हावं आणि घर चालावं यासाठी चाललेला यमुनेचा संघर्ष हा पुरुषी सरंजाम वृत्तीमुळे दुखाच्या महासागरात लोटला जातो. तिचा हा प्रवास पान खाऊन तोंडावर थुकलेला नवरा ते स्वताच्या नागड्या प्रतिमा पाशवी नजरेने बघणारे स्वताचे मुल इथपर्यंत येऊन थांबतो. या प्रवासात विद्यार्थ्यापासून प्रोफेसर झालेला जयराम (ओम भूतकर) सारखी काही माणसं साथीला असतात मात्र ती समाज बदलण्याइतकी ताकत लावण्यात अपयशी ठरतात.

सिनेमाची एक-एक फ्रेम चित्रकला वाटते. एक-एक संवाद जबरदस्त आहे. चंद्राक्का सारख्या निडर बाई समाजाच्या भट्टीत तावून-सुलाखून निघाल्यानंतर जगाला तत्वज्ञान सांगते. ‘या जगात गरीब बाई सगळ्यांना नागडीच दिसते.’ ‘सगळी आपल्याकड वक-वक नजरेन बघत्यात पण इथ नजरेत वक वक नसते, त्यांना आपल्या शरीराशी काही देणंघेणं नाही. ‘शिक्षणाचं कामय हे त्यात कसली आली लाज.’ असे एक-एक संवाद छाया कदम यांच्या मुखातून येतात जे सुखावून टाकतात. छाया कदमने या पात्रात जी जान ओतलीय ती तिच्या आतापर्यंतच्या सगळ्या भूमिकेचा परिपाक होता. फँड्रीतली नानी व्हाया सैराटमधली सुमनआक्का ते चंद्राक्का ही पात्र तिने जशी वटवलीत त्यामुळे दिग्दर्शकाला तिच्या भूमिकेला पर्याय शोधणे कठीण होणार आहे. न्यूडमधला ‘माझा वट आहे, मुकादम बदलतील, शिक्षक बदलतील पण मी नाय बदलत’ हा डायलॉग ‘माझा वट आहे, सिनेमे बदलतील, दिग्दर्शक बदलतील पण मी नाय बदलत’ या वाक्यात रुपांतरीत होईल आणि होणारच. कल्याणी मुळेला या भूमिकेसाठी खरोखर सलाम. तिच्या चेहऱ्यावरची भीती किंवा अस्वस्थता ही संपूर्ण सिनेमाभर पोटात गोळा आणणारी आहे. ज्यावेळी ती मंगळसूत्र तोडले त्यावेळी धस होतं, त्यावेळी असं वाटत स्त्री सगळ्या जाचातून मुक्त झालीय की काय…! आपल्या मुलाला लहान्यालाही (मदन देवधर) चित्रकलेची आवड आहे हे कळल्यावर, आपण जिथे न्यूड पोझिंग करतो तिथे जे.जे. कलाशाळेतच शिकायला येऊ नये म्हणून यमुना त्याला औरंगाबादला कलाशिक्षण घ्यायला पाठवते. तेव्हा ती चंद्राक्काला म्हणते- याला जर कलेचं मर्म कळलं, तर मी काय करते ते ठाऊक झाल्यावरही हा माझ्या पायावर डोकं ठेवून माझी पूजा करील. पण त्याला ते नाहीच उमगलं तर…! ते लहान्याला उमगतंय की नाही हे तर सिनेमाच्या शेवटाला कळतं. एक मात्र नक्की कि, रवी जाधवांनी दोन विचारधारा या सिनेमात अगदी समांतर चालविल्या आहेत. त्या कोणत्या ते सिनेमा पाहिल्यावर लक्षात येईलच.

चित्रकार ऑगस्ट रोडीन म्हणतात “The nude alone is well dressed.” म्हणजे एकांतात नग्नता हा सर्वात सुंदर ड्रेस आहे. तर हेन्री मेटीस म्हणतात जेंव्हा कलाकार किंवा विद्यार्थी न्यूड आकृती काढतो तेंव्हा त्याचे फलित हे चित्र असत, भावना नव्हे. हे सगळे पाश्च्यात संदर्भ आमच्या कधीच लक्षात येत नाहीत. आपल्याकडे जास्त प्रमाणात नग्नतेकडे अश्लीलतेच्या नजरेनेच पाहिले जाते. याचे कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत दडलेले आहे, असे मला वाटतेय. आपल्याला प्राथमिक शाळेत किंवा अगदी महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत नग्न, नग्नता हे शब्द म्हणजे पाप समजून कधी याचा अर्थ उलगडून सांगितला जातच नाही. कलेच्या अंगाने तर विचारच करायचा सोडा. शाळांमध्ये चित्रकलेच्या तासाला आमच्यातले कित्येक चित्रकार मरतात हे आम्हालाही कळून येत नाही. भारतीय समाजामध्ये प्रचंड विरोधाभास आहे. एकीकडे पुराणात किंवा खजुराहोमध्ये आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये नग्नता ही अत्यंत कल्पक कला होती आणि त्या कलेचा एक सन्मान म्हणून त्याला पूजले जाते. खजुराहोला नग्नतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. तिथे जाऊन संस्कृतीरक्षक वंदन करतात आणि दुसरीकडे कलात्मकतेचा कुठलाही संदर्भ लक्षात न घेता पुराणांचे गोडवे गाणारी मंडळी नग्नतेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. फक्त सिनेमाचे नाव न्यूड आहे म्हणून.

असो, न्यूड पुरुषी असण्याला लायकीवर आणणारा. कलाकार असण्याचा धर्म जगायला लावणारा हा सिनेमाय. छाया ताई, कल्याणी मुळे तुम्ही दोघींनी अख्खा खाल्लाय सिनेमा. बाकी नसरुद्दीन शहा थोड्या वेळेतच लक्षात राहून जातात हे त्यांचं कलेचा हिमालय असण्याचं यश. छाया ताई, तुझ्याविषयी रिस्पेक्ट लाखपटीने वाढलाय. जब्याच्या नानीच्या तोडीचा याउलट त्यापेक्षाही उजवा परफॉर्मन्स. अभिनय, संगीत, कॅमेरा, लोकेशन, एक-एक फ्रेम, एक-एक कलाकार बापय. रवी जाधव यांनी मोठ्या मेहनतीने चित्रपटरुपी कागदावर उतरवलेलं हे चित्र समाजाच्या पुरुषी आणि कलेकडेही धर्म, संस्कृती अन अश्लील नजरेनं बघणाऱ्या विचारसरणीला भेदत अंगावर काटा आणतंय. नागव्या नजरांना लाज आणतेय हे न्यूड चित्र.

– निलेश झालटे