सत्तर फुट खोल खदानीत पडलेले हरीण साडेतीन तासानंतर काढले सुखरुप

0

वन्यजीव संस्थेसह आपातकालीन विभागाच्या अधिकार्‍यांसह, कर्मचार्‍यांचे शर्थीचे प्रयत्न ; वनविभागाने ताब्यात घेवून उमाळ्याच्या जंगलात सोडले

जळगाव- पाण्याचे दुर्मिक्ष असल्याने वन्यजीव, प्राणी जंगलातून नागरी वस्त्यांकडे वळले असल्याची अनेक उदाहरणे व घटना समोर आल्या आहेत. अशाप्रकारे खोटेनगरात परिसरात फिरत असलेले हरीण आढळून आले. पाठलाग करणार्‍या कु÷त्र्याच्या पासून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात भितीने पळत सुटलेले हरीण मंगळवारी दुपारी तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या 70 फुट खोल खदानीत पडल्याची घटना घडली. या हरीणाला जिल्हा आपत्ती निवारण विभाग, महापालिका अग्निशमन विभाग तसेच वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल साडेतीन तासानंतर हरीणाला खदानीतून सुखरुप बाहेर काढले. वनविभागाने ताब्यात घेवून त्याला सुरक्षितरित्या उमाळा शिवारातील जंगलात सोडले आहेत. दरम्यान कर्मचारी, अधिकार्‍यांची कसरत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. हरिणाला सुखरुप बाहेर काढल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. या घटनेमुळे मान्सूनपूर्वीच जिल्हा आपत्ती विभागाची प्राणी तसेच मनुष्य बचावसंदर्भातील ‘मॉकड्रील’ झाली आहे.

कृषी महाविद्यालय परिसरात कुत्रे लागले पाठीमागे
पाण्याच्या शोधात हरिण वस्तीभागात म्हणजे जुन्या महामार्गालगत असलेल्या कृषि महाविद्यालय परिसरात हरिण आले. याठिकाणी त्याच्या पाठीमागे कुत्रे लागले. भितीने हरिण गल्ल्यांमधून पळत सुटले. पळत असताना अचानक तालुका पोलीस ठाण्याजवळील खदानीत पडले. याबाबत माहिती नागरिकांनी नजीकच असलेल्या तालुका पोलीस ठाण्यात कळविली. पोलिसांनी तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी.रावल यांना प्रकार कळविला. त्यांनी त्यांच्या अखत्यारीत महापालिका अग्निशमन विभाग, तसेच वनविभागाच्या अधिकार्‍यांना घटना कळविली. काही वेळातच सर्व विभाग, कर्मचारी अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

भर ऊन्हात कर्मचार्‍यांची तारेवरची कसरत
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी, अश्‍वजीत घरडे, प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, रवी सपकाळे, तेजस जोशी हरिण बचाव मोहिमेला दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. वन्यजीव सदस्य योगेश गालफाडे, बबलू सोनवणे, निलेश ठाकूर, ईश्‍वर राजपूत हेही यावेळी मदतीसाठी धावून आले होते. 70 फूट खदान व त्यात दलदल यामुळे कर्मचार्‍यांची तारेवरीची कसरत होती.

साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनी मोहिम फत्ते
आपतकालीन साहित्य शिडी, दोरखंड याव्दारे प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे व अश्‍वजीत घरडे खदानीत उतरले व खदानीच्या मधोमध असलेल्या टेकडीवर पोहचले. टेकडी 40 ते 50 फूट उंच होती. खाली हरिण होते. दोन कर्मचारी खाली उतरले. 3.38 वाजता कर्मचार्‍यांना हरिणाला दोर बांधण्यात यश आले. मात्र हरिण वरत खेचता येत नव्हते. यात दगडांमुळे हरिण बिचकत असल्याने अडचणी वाढत होत्या. यादरम्यान हरिणाने अनेकदा सुटण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला सुखरुप काढण्याच्या चंग बांधलेल्या कर्मचार्‍यांनी कुठलीही चूक केली नाही. टेकडीच्या दुसर्‍या बाजूला उभ्या असलेल्या वन्यजीव सदस्यांकडे हरिणाला बांधलेल्या दोराचे टोक लांबवून फेकण्यात आले. अशाप्रकारे तब्बल साडेतीन तासानंतर 4.17 वाजेच्या सुमारास हरिणाला सुखरुप बाहेर काढण्यात सर्वांना यश आले. हिरणाला वाचविण्याची मोहिम फत्ते

वनविभागाने हरिणाला उमाळ्याच्या जंगलात सोडले
सुखरुप बाहेर काढलेल्या हरिणाला वनविभागाच्या ताब्यात आलेे. वन अधिकारी जी.आर.बडगुजर व चालक योगेश पाटील यांनी ताब्यात घेवून वाहनातून त्याला उमाळा येथील जंगलात नेण्यात आले. याठिकाणी त्याला सोडण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तरुणांसह अनेकांनी आपल्या मोबाईलध्ये व्हिडीओ, तसेच छायाचित्र काढले व सोशल मिडीयावरुन ती व्हायरल केली.