नवी दिल्ली-सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे किंवा तशा पोस्ट लिहिणे हा गुन्हाच ठरणार आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे. २० एप्रिल रोजी भाजपा नेता एस. व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक पेजवर लिहिली होती. या प्रकरणी एस. व्ही. शेखरना जामीन नाकारत मद्रास हायकोर्टाने फेसबुक असो किंवा इतर सोशल मीडिया त्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे किंवा फॉरवर्ड करणे गुन्हाच आहे असे म्हटले आहे.
कोर्टाचे आदेश
एकाही माणसाला महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य पोस्ट करण्याचा हक्क नाही. जर त्या माणासाने असे केले किंवा कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट केली तर तो गुन्हाच ठरणार आहे. असंसदीय शब्द वापरुन महिलांची बदनामी करणे हे जास्त खटकणारे आहे असेही कोर्टाने म्हटले आहे.
समाजात चुकीचा संदेश जातो
एखाद्या कृतीपेक्षा शब्द जास्त परिणामकारक ठरतात. जेव्हा एखादी व्यक्ती राजकीय किंवा समाजातील महत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती असते तेव्हा त्याने केलेल्या पोस्टवर लोक विश्वास ठेवू लागतात. काय म्हटले गेले आहे हे महत्त्वाचे आहे, मात्र त्याचसोबत ते कोणी म्हटले आहे ते पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. जर पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या सेलिब्रिटीने आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्या तर त्यातून समाजात चुकीचा संदेश जातो असेही कोर्टाने म्हटले आहे.
महिला पत्रकाराने केली तक्रार
काम मिळवायचे असेल तर महिला पत्रकार सेक्स करण्यासाठी अत्यंत सहज तयार होतात. मीडिया हाऊसेसमधील मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शय्यासोबत केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत, वृत निवेदकही होऊ शकत नाहीत या आशयाची एक फेसबुक पोस्ट भाजपा नेता एस. व्ही. शेखरने लिहिली होती. या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता याच प्रकरणात शेखरने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असताना तो फेटाळून लावत नेते, सेलिब्रेटी आणि प्रतिष्ठित व्यक्ती असोत किंवा कुणीही आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केली किंवा लिहून पोस्ट केली तर गुन्हाच आहे असे म्हटले आहे. तसेच शेखर याचा जामीन अर्जही फेटाळला आहे.