धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू ; आसोदा शिवारातील घटना

जळगाव l  आसोदा शिवारातील डाऊन रेल्वेलाईनवर धावत्या रेल्वेतून पडून बाबुभाई माणखाँ पठाण (वय ६९, रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) या वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, ५ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे, नगरसूल येथील बाबुभाई पठाण हे शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत होते. आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाईनवरील खांबा क्रमांक ४२६ / ते ३ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलीस ठाण्यातील विलास शिंदे व माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतल्यानंतर खिश्यामध्ये आधारकार्ड, मतदानकार्ड मिळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.  शिंदे यांनी लागलीच येवला पोलिसांना संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यास सांगितले, त्यानंतर येवला पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर नातूशी संपर्क झाला. शिंदे यांनी लागलीच पठाण यांचा नातू इरफान याच्या मोबाईलवर मृतदेहाचा फोटो पाठविल्यानंतर त्याने त्याच्या आजोबांना ओळखले. त्यानंतर नातू मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाला होता. दरम्यान, मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला होता.