मुंबई:काँग्रेसचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहिल्यामुळे भारताचा ऑलिम्पिकवीर कुस्तीगीर नरसिंग यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या नरसिंग हा सहाय्यक पोलिस आयुक्त या पदावर असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंग यादवला उत्तेजक सेवनाच्या आरोपांमुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. त्याच्यावर चार वर्षांची बंदीही घालण्यात आली. या बंदीचा कालावधी संपत आलेला असताना त्याच्यासमोर हे नवे संकट उभे राहिले आहे.
काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारसभेत नरसिंग उपस्थित होता. निरुपम हे मुंबई उत्तर पश्चिम विभागातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. रविवारी झालेल्या सभेत नरसिंग सहभागी झाला होता. तेथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याने राज्य निवडणूक कार्यालयाकडे यासंदर्भातील अहवाल सादर केला. त्याआधारे आंबोली पोलिसांनी नरसिंगविरोधात गुन्हा दाखल केला. नियमानुसार सरकारी सेवेत असलेली व्यक्ती राजकीय सभा, प्रचार रॅलीत सहभागी होऊ शकत नाही. नरसिंगने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने पदके जिंकली आहेत.