नाशिक महानगर शिवसेनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात कार्यरत क्रीडापटूंचा मान्यवरांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करून नाशिक येथे योग्य सन्मान
शहादा, ता. 28: नाशिक महानगर शिवसेनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात कार्यरत क्रीडापटूंचा मान्यवरांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करून नाशिक येथे योग्य सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शहादा येथील महिला कराटे प्रशिक्षिका योगिता बैसाणे यांचा सन्मान करण्यात आला.
शुभमंगल कार्यालय बळी मंदिर मागे आग्रा रोड, नाशिक येथे नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे व अर्जुन पुरस्कार विजेते सईद जलालुद्दीन रिझवी (ऑलिम्पियन) यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब चौधरी (उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख) हे होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, क्रीडा विभागाच्या उपसंचालिका श्रीमती सुनंदा पाटील, ग्लोबल ह्यूमन रिसर्च ॲण्ड वेल्फेअर सोसायाटीचे अध्यक्ष डॉ. बलवंत सिंह, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजु लवटे, नाशिक शिवसेना महानगर प्रमुख प्रविण तिदमे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्कारांसाठी उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात कार्यरत महिला व पुरुष क्रीडा पटूंना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शहादा येथील शेठ व्ही.के.शाह विद्यालयातील शिक्षिका व महिला कराटे प्रशिक्षिका योगिता बैसाणे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. त्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व क्रिडा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक महानगर शिवसेनेच्या वतीने पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन अजय बोरस्ते, अशोक दुधारे, उदय खरे, नंदकिशोर खैरनार, दीपक पाटील, दीपक निकम, राजु शिंदे, ज्योती निकम, मनिषा काठे, अविनाश वाघ, रूषिकेश रसाळ आदी सहकाऱ्यांनी केले होते.
सौ.योगिता बैसाणे या शहादा येथील कराटे मास्टर प्रमोद बैसाणे यांच्या पत्नी आहेत. त्यांची उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.