मुंबई-पेट्रोल, डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारने २.५ रूपयांची करकपात केल्यानंतर राज्य सरकारने देखील २.५ रुपये असे एकूण ५ रुपये करकपात करण्यात आले होते. त्यामुळे नागरिक सुखावले होते मात्र पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचीदरवाढ सुरू झाली आहे. आज मुंबई आणि दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८७.५० रूपये झाले आहे. तर दिल्लीमध्ये प्रति लिटर पेट्रोल ८२.०३ रुपये झाले आहे.
मुंबईमध्ये डिझेल प्रतिलिटर ३१ पैशांनी वाढले आहे. मुंबईमध्ये डिझेल आता ७७.३७ रूपये प्रति लिटर झाले आहे. नवी दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर ७३.८२ रूपये मिळेल. नवी दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर २९ पैशांनी वाढले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली, मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली आहे.
काल दिल्लीमध्ये प्रति लिटर १४ पैशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली. तर मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १४ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर ३१ पैशांनी वाढले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरामध्ये ४.३६ रुपयांनी, तर डिझेलच्या दरामध्ये केवळ २.५९ रुपयांची कपात करण्यात आली. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६० रुपयांच्या आसपास होता. २०१७ मध्ये तो ८० रुपयांच्या पुढे गेला आहे.