खडसे महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..

मुक्ताईनगर प्रतिनिधी…

येथील खडसे महाविद्यालय येथे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत “भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांना नवीन रोजगाराच्या संधी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. के.के. अहिरे (पी.ओ. नाहाटा महाविद्यालय,भुसावळ) यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन हे होते. प्रमुख वक्ते डॉ. के.के.अहिरे यांनी या कार्यशाळेप्रसंगी आपले व्याख्यान सादर करताना भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत रोजगाराच्या उपलब्ध असलेल्या विविध संधी व क्षेत्रे या संदर्भात विस्तृत व उदाहरणादाखल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वार्ताहार, संपादक, मुद्रक, ग्रंथ परीक्षण, ग्रंथ लेखन, मुद्रित शोधन, निवेदन, सूत्रसंचालन, कॉल सेंटर, भाषांतर,अनुवाद,रेडिओ जॉकी, वक्तृत्व व आधुनिक काळातील समाज माध्यमांवरील लेखन इत्यादी क्षेत्रातील संधीमध्ये नोकरी व करिअर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन यांनी उपस्थितांना भाषेच्या माध्यमातून संवाद व लेखन कौशल्य विकसित करून त्याद्वारे नोकरी व व्यवसायाच्या नव्या वाटा निर्माण करण्याचे ध्येय निश्चित करून त्या वाटेवर मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.दीपक बावस्कर (मराठी विभाग प्रमुख) यांनी केले त्याद्वारे त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू, महत्त्व व उपयोगिता स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा.सी.डी.खर्चे यांनी केले तर आभार .योगेश बकाले या विद्यार्थ्याने मानले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. ए.पी.पाटील,डॉ.आर.टी. चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.