मुंबई :- येत्या दिवाळीमध्ये घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर थोडा धीर धरा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा 1 हजार घरांची सोडत काढणार आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असून, जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही घरे गोरेगाव, बोरिवली, विक्रोळी, मुलुंड, अॅण्टॉप हिल आणि मानखुर्द आदी ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी 200 घरे ठेवण्यात आली आहेत. या घरांची निश्चिती मुंबई मंडळाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण 1 हजार स्वस्त घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.