नवी दिल्ली- तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होईल याचा काही नेम नाही. तरुणांकडून सोशल मीडिया व तंत्रज्ञानाचा गैरवापर होतो आहे, अशी एक घटना समोर आली आहे, ज्यात एका तरुणाने फेसबुक या सोशल साईटवरून लाइव्ह करत आत्महत्या केली आहे.
अनेकदा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती न होऊ शकल्याने नाराज झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्या करताना फेसबुकवर लाइव्ह करत आपल्या आत्महत्येचं कारण सांगतिले आहे. धक्कादायक म्हणजे तरुण फेसबुक लाइव्ह करत असताना २७५० जण पाहत होते, मात्र एकानेही त्याच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना फोन करुन कळवले नाही.
मुन्ना कुमार असे या तरुणाचे नाव आहे. मुन्ना कुमार बीएससी ग्रॅज्युएट असून आग्रा येथील शांतीनगरमध्ये राहायचा. बुधवारी सकाळी फेसबुकवर एक मिनिट नऊ सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने सांगितले. त्याचा हा व्हिडीओ २७५० जण पाहत होते, पण कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. एकालाही त्याच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना कळवत आत्महत्या करण्यापासून रोखावं असं वाटलं नाही. तरुणाने सहा पानांची सुसाईड नोट लिहिली असून आपल्या आत्महत्येसाठी आपणच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय लष्करात भरती होऊ न शकल्याने तसंच आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण न करु शकल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं मुन्नाने लिहिलं आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नाने पाच वेळा प्रवेश परिक्षा दिली होती. ‘भगत सिंह यांच्यापासून मुन्ना प्रचंड प्रेरित होता. भारतीय लष्करात भरती होणं त्याचं स्वप्न होतं. आत्महत्या करण्याआधी तो नेहमीप्रमाणे वावरत होता. रात्रीदेखील आम्ही एकत्रच जेवलो. कुटुंबातील कोणालाही तो आत्महत्या करेल असं वाटलं नव्हतं’, असं मुन्नाचा भाऊ विकास कुमारने सांगितलं आहे.