अमळनेर – पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीने स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे आज घडली. अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंड परिसरामधील हा प्रकार आहे. अनिल खैरनार याने पत्नी सरिता खैरनार (33) आणि मुलगी तनुजा (५ ) यांना पेट्रोल ओतून पेटविले. यानंतर स्वतः अनिल खैरनारने मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सरिता व त्यांची पाच वर्षांची चिमुकली तनुजा भाजल्याने गंभीर जखमी झाल्या. दरम्यान उपचारादरम्यान तनुजा हिचा मृत्यू झाला आहे.
चिमुकलीचा मृत्यू
अनिल खैरनार निवृत्त सैनिक होते. ते मूळचे शिंदखेडा तालुक्यातील दुसानेयेथील रहिवासी होते. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास त्याने पत्नी सरिता झोपेत असताना तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. वेळीच जाग आल्याने सरिताने त्याचा प्रतिकार केला. मात्र पेट्रोल टाकून अनिलने पत्नीला पेटविले. हा प्रकार पाहून पाच वर्षांच्या तनुजाने आईकडे धाव घेतली त्यात ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर दोघींना अमळनेरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरिता४२ टक्के तर तनुजा ९० टक्के भाजल्याने प्रथमोपचार करून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरिताच्या गळ्याला २० टाके पडले असून धुळे पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला आहे.