कांद्याचे भाव 700 रुपयांनी कोसळले
शेतकरी हवालदिल : किसान सभेचा आंदोलनाचा इशारा, मुख्यमंत्र्यांच्या दारात ओतू कांदा
नाशिक | प्रतिनिधी
कांद्याचे दर कोसळल्याने किसान सभेने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दारात कांदा ओतून आंदोलनाचा इशारा दिला आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करत पाऊले उचलावी अन्यथा किसान सभा आरपारचा संघर्ष करेल असा इशारा किसान सभेच्या डॉ. अजित नवले यांनी दिला आहे. कांद्याचे दर 700 रुपयांनी कोसळल्यामुळे शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
अजित नवले यांनी एक व्हिडिओ जारी करत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कांद्याचे दर कोसळल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सिन्नर, मनमाड, चांदवड आणि नांदगाव या कांद्याच्या प्रमुख बाजारपेठांत कांद्याचे दर 450 ते 700 रुपयांनी कोसळले आहेत. कांद्याचा सरकारने सांगिलेला उत्पादन खर्च हा प्रतिक्विंटल 850 ते 900 रुपये इतका आहे. अशात जर शेतकर्याला कांदा 450 ते 500 रुपये क्विंटल विकावा लागल्यास उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतुकीचा खर्चही निघणार नाही. शेतकरी अशा वाईट स्थितीत सापडलेला असताना सरकार मात्र सत्तासंघर्षात मश्गुल आहे. कोणाचे चिन्ह काय, कोणाच्या मागे किती आमदार आणि सरकार कोणाचे टिकणार हा खेळ सत्ताधार्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेला आहे.फ
सरकारने उत्पादकांना वार्यावर सोडले
नवले पुढे म्हणाले की, मराज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना वार्यावर सोडल्याचीच भूमिका घेतलेली आहे. किसान सभेच्या वतीने आम्ही सरकारला इशारा देतो की, त्यांनी सत्तेचा खेळ थांबावावा आणि कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा. निर्यातीला प्रोत्साहन देणे, निर्यात अनुदान देणे, तसेच शेतकर्यांना प्रतिक्विंटल 600 रुपये अनुदान थेट त्यांच्या खात्यात द्यावे अशी मागणी आम्ही किसान सभेच्या वतीने करत आहोत. सरकारने असे केले नाही तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, सहकारमंत्री आणि पणनमंत्र्याच्या दारात कांदा ओतण्याचे आंदोलन करून आरपारचा संघर्ष करेल. शेतकर्यांवर ही वेळ येऊ नये यासाठी सरकारने पावले उचलावी अन्यता किसान सभा आरपारचा संघर्ष करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
512 किलो कांदा विकून मिळाला 2 रुपयांचा चेक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका शेतकर्यासोबत घडलेला प्रकार समोर आणला आहे. शेतकर्याने 10 पोती कांदा व्यापार्याला विकला. यात 500 किलो कांदा विकून त्याला अवघे 512 रुपये मिळणार होते. मात्र, त्यापैकी 509 खर्च वजा करुन घेत त्याला 2.49 रुपयांचे बील देण्यात आले. यासाठी त्याच्या नावे केवळ 2 रुपयांचा चेक काढण्यात आला. हा चेक देखील 15 दिवसांच्या पुढचा देण्यात आला आहे.