जळगाव – जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या केवळ २४ टक्के असून ६६ टक्के नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सांगितले आहे. नव्या ओमिक्रॉन या व्हेरीयंटपासून सावध राहण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
अफ्रिकन देशात आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जिल्हावासियांसाठी संवाद साधला. जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, लसीकरण हे या व्हेरीयंटसाठी महत्वाचे आयुध आहे. लसीकरण झाल्यानंतर या व्हेरीयंटची तीव्रता कमी असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने अधिसुचना काढली आहे. यापुढे शासकीय कार्यालये, आस्थापना, लग्न, मेळावे याठिकाणी लसीकरणाचे दोन्ही डोस बंधनकारक केले आहे. प्रवासासाठी देखिल लसीकरण पुर्ण होणे गरजेचे आहे. दोन डोसनंतर १४ दिवस होणे ही पुर्ण लसीकरणाची व्याख्या आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतरचा दाखला हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. अडचणीचे दिवस पुन्हा येणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात ४८०० ऑक्सीजन बेड असुन १२० मे.टन ऑक्सीजनची क्षमता १० डिसेंबरपर्यंत पुर्ण होइल. जिल्हावासियांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.