नवी दिल्ली- हरिणाया राज्यातील हिसारमध्ये राहणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या शिवांगी पाठक या मुलीने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे शिवांगीने सांगितले. अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत.
एव्हरेस्टची यशस्वी चढाई करणे , हे स्वप्न होते आणि याद्वारे महिला कोणतेही लक्ष्य पार करण्यासाठी सक्षम आहेत हे दाखवून द्यायचे होते असे शिवांगी म्हणाली. वयाच्या दहाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा यांचा व्हिडीओ शिवांगीने पाहिला होता. अरुणिमा यांचा व्हिडीओ पाहून ती इतकी प्रभावित झाली की तेव्हापासून तिने एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चय केला. त्यानंतर शिवांगीने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान शिवांगीने केदारनाथ, बद्रीनाथच्या मोठमोठ्या टेकड्या पार केल्या. शिवांगीचे वडील राजेश पाठक हे व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे.