आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या तिकीटाची केवळ दोन मिनिटात विक्री

0

हैदराबाद : आयपीएल 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला आव्हान देणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. विशेष म्हणजे केवळ दोन मिनिटात अंतिम सामन्याच्या तिकीटाची विक्री झाली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे आणि त्या सामन्याची तिकीटे अवघ्या दोन मिनिटांत विकली गेली. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि त्यांनी तिकीट विक्रीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

बीसीसीआयने मंगळवारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अंतिम सामन्याच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केली. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची क्षमता ही 39 हजार इतकी आहे. त्यापैकी 25 ते 30 हजार तिकीटं विक्रीसाठी ठेवली जातात. मात्र, यावेळी किती तिकीटं विक्रीसाठी ठेवण्यात आली याची कल्पनाच कुणाला देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1000, 1500, 2000, 2500, 5000, 12500, 15000 आणि 22500 अशी तिकिटांची किंमत आहे. मात्र, ऑनलाईनवर फक्त 1500, 2000, 2500 आणि 5000 रुपये किंमत असलेली तिकीटं होती आणि तेही विकली गेली. 1500 व 2000 रुपयांची तिकीटं आता खिडकीवर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑनलाईन तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीकडून सुधीर रेड्डी यांनी सांगितले की,”मी कोणतीच माहिती देऊ शकत नाही. आम्हाला जेवढी तिकीटं देण्यात आली ती आम्ही विकली. याव्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास ती बीसीसीआयकडे विचारावी.”