सिल्लोड l सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये साहेब खा गुलजार खा पठाण यांनी तब्बल 27 वर्षांपूर्वी अब्दुल समद मोहम्मद शरीफ यांना आपली 1 एकर 7 गुंठे जमीन तारण दिली होती. त्यांचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हिबा करारानुसार त्यांनी आपला व्यवहार संपुष्टात आणला होता. परंतु तब्बल 27 वर्षानंतर विद्यमान तलाठी काशिनाथ ताठे सिल्लोड यांनी या जमिनीचा फेर घेऊन सातबारा मध्ये अब्दुल समद यांचे नाव समाविष्ट केले. या बेकायदेशीर कृती विरोधात साहेब खा गुलजार का पठाण यांचे कायद्याने वारस असलेले त्यांचे तिन्ही मुलांनी मा. उपविभागीय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करून दाद मागितली. प्रकरणांमध्ये संपूर्ण न्यायालयीन कारवाई पूर्ण केल्यानंतर विद्यमान उपविभागीय अधिकारी श्री कुलदीप जंगम यांनी दिनांक 09/05/2023 रोजी स्पष्ट आदेश पारित केला. या आदेशात त्यांनी स्पष्ट नमूद केले की, तलाठी यांनी घेतलेला विवादित फेर 26612 रद्द करण्यात येतो तसेच सर्वे नंबर 92 चा सातबारा चुकीचा दिसून येत आहे. या सर्वे नंबर मधील सर्व जमीनी प्रतिबंधित सत्ता प्रकार म्हणजेच भोगवटादार वर्ग-2 असायला हवी. त्यानुसार त्यांनी विद्यमान तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांना आदेशित केले. सर्वे नंबर 92 मधील शासन वाटप झालेल्या सर्व जमिनी बाबतीत शर्तभंग झालेला असल्यामुळे तसा सविस्तर अभिलेख अहवाल जिल्हाधिकारी यांना 30 दिवसात पाठवावा. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधित सत्ता प्रकार मधील जमीन खरेदी विक्री करताना शासनाची परवानगी घेणे बंधनकारक असून, तशी परवानगी घेतलेली नसल्यास शासन ती जमीन जप्त करू शकते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशामुळे सिल्लोड शहरात एकच खळबळ उडाली आहे. कारण सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक लोकांचे प्लॉट, जमीनी आहेत. त्याचप्रमाणे कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची शैक्षणिक संस्था नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या मालकीची तब्बल 21 एकर 11 गुंठे जमीन याच सर्वे नंबर मध्ये आहे. सध्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी मार्फत या ठिकाणी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल साठी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या आदेशामुळे अब्दुल सत्तार यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले मेडिकल कॉलेजचे काम पुढे होणार की थांबणार? याबाबत शंका निर्माण झालेली आहे. सध्या संपूर्ण शहरात या विषयावर विविध खमंग चर्चा सुरू असून, पुढील कारवाईबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सदर प्रकरणात बेकायदेशीर व नियमबाह्य फेर घेतल्यामुळे तत्कालीन मंडळ अधिकारी विनोद धोकटे व विद्यमान तलाठी काशिनाथ ताठे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात पठाण यांच्यावतीने एडवोकेट जी. व्ही. ढोणे यांनी काम बघितले आणि सामाजिक कार्यकर्ते श्री महेश शंकरपेल्ली यांनी पठाण यांना सहकार्य केले.