वरणगाव प्रतिनिधी ।
तालुका कुस्तीगीर संघ व श्री हनुमान व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल श्री हनुमान व्यायामशाळेत दि. १० ते ३० मेपर्यंत भव्य कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी परिसरातील कुस्तीपटूंनी सहभागी होवून डावपेचाचे ज्ञान वृद्धींगत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत ८ मे रोजी झालेल्या बैठकीत परिसरातील मल्ल गुणांच्या कुस्तीमध्ये मागे का पडतात? यावर सखोल चर्चा करण्यात आली. आजपर्यंत आपल्या तालुक्यात कुस्तीचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षकांकडून कुणीही प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली नव्हती. आजपर्यंत अशी कुस्ती प्रशिक्षण शिबिरे ही पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, श्री हनुमान व्यायाम रा नाशिक, इंदूर, उत्तर प्रदेशातील महू इत्यादी भागामध्येच पार पडत असतात. तेथे सर्वसामान्य गरीब घरातील कुस्तीपटुंना खर्च पेलवत नाही. त्यामुळे आपली मुले मागे राहतात म्हणून आपल्या तालुक्यात पण असे प्रशिक्षण झाले म्हणजे त्यांना डावपेचासह कुस्ती खेळातील गुणदान पद्धतीचे ज्ञान मिळेल व आपली मुले राज्यासह देशपातळीवर प्रतिनिधित्व करू शकतील. या उदात्त हेतुने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून वरणगांव व परिसरातील कुस्तीपटूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यपातळीवरील प्रशिक्षक देणार प्रशिक्षण
शिबीरात सहभागी होणाऱ्या कुस्ती पटुना राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केलेले प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. यात मुलींसाठी सुद्धा कुस्ती खेळाच्या प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून भुसावळ तालुक्यासह परिसरातील कुस्तीपटुंनी सहभाग घेऊन आपले कुस्ती खेळाचे ज्ञान वाढवावे. व आपल्या भागासह आई वडीलांचा नावलौकीक वाढवावा असे आवाहन श्री हनुमान व्यायाम शाळा व तालुका कुस्तीगीर संघातर्फे करण्यात आले आहे.