उस्मानाबाद-लातूर-बीडमध्ये भाजपचे सुरेश धस विजयी; राष्ट्रवादीला धक्का

0

उस्मानाबाद :- उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा ७४ मतांनी पराभव करत प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली. एकूण १००३ मतांपैकी धस यांना ५२६ तर जगदाळे यांना ४५२ मते मिळाली. १ मत नोटाला गेले तर २५ मते बाद ठरवण्यात आली आहेत. अशोक जगदाळेंच्या पराभवासोमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे पंकजा मुंडेसाठी आगामी निवडणुकीत आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो.

मतमोजणीत गोंधळ
आज (मंगळवार) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर धस यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मनाला जात होता. पहिल्याच फेरीत याबाबत चित्र स्पष्ट होईल असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. मात्र, मतमोजणीत गोंधळ असल्याचे सांगत राष्ट्रवादीप्रणित उमेदवार अशोक जगदाळे यांनी पुन्हा मतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यामुळे मोजणीच्या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता. या मतदारसंघासह राज्यातील इतर सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक झाली होती. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल २४ मे रोजी जाहीर झाले होते.