जकार्ता-आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात पी.व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. सिंधू आणि यिंग यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच यिंगचे पारडे जड होते. आतापर्यंत यिंगने सिंधूला ९ वेळा पराभूत केलं आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती करणं तिला जमलं नाही. अंतिम सामन्यात यिंगने सिंधूचा केलेला पराभव हा तिचा १० वा पराभव ठरला आहे.
उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर मात केलेली सिंधू अंतिम फेरीत चीन तैपेईच्या ताईत्झु यिंगला पराभव करेल अपेक्षा होती. मात्र पहिल्याच सेटमध्ये सिंधूला चांगलाच धक्का बसला यिंगने झटपट ५ गुणांची कमाई करत सिंधूला मागे टाकले.
सिंधूने वेळेत सावरत सेटमध्ये पुनरागमन केलं, मात्र यिंगची आघाडी कमी करण्यात तिला यश आलं नाही. यिंगच्या खेळात असलेल्या आक्रमकतेला सिंधूला तोंड देता आलं नाही. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅलीज रंगल्या, यामध्ये सिंधूने आपल्या उंचीचा फायदा घेत काही चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र मध्यांतरापर्यंत यिंगने ११-७ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतरही सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र यिंगने सिंधूला फारशी संधी न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.