पाचोरा तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर

0

ऐन हंगामात शेतीकामात अडथळा : वनविभागाकडून दवंडी

पाचोरा (प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील सारोळा बु: येथे आज दि. ७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात काम करणार्‍या सालदारांना बिबट्या आढळून आला. शेजारील हाकेच्या अंतरावर असलेल्या नालाबांध तेथे तो पाणी पिण्यासाठी आल्याने जवळच झाडावर चढून बसलेला आढळून आला.यामुळे शेतकर्‍यांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही पाचोरा तालुक्यात वरसाडे भागात बिबट्याच्या वावर निदर्शनास आला होता. त्याने एका भिल्ल समाजाच्या महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला होता. तर हडसन येथे नीलगायीच्या बछड्यास देखील जखमी केले होते. या बिबट्यास अद्याप जेरबंद करण्यास वनविभागास अपयश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारोळा बु शिवारात नाना खंडू पाटील यांच्या शेताच्या बाजूला नाला असून तेथे पाणी पिण्यासाठी हा बिबट्या आला असल्याचे प्रत्यक्षदर्शी सालदारांनी सांगितले. त्यांनी तात्काळ गावातील प्रगतिशील शेतकरी अविनाश देशमुख यांना याबाबत कळविले. देशमुख यांनी पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांना भ्रमणध्वनीद्वारे शेतात बिबट्या असल्याची माहिती कळवली. तातडीने दखल घेत वनविभागाचे वनपाल सुनील भिलावे, वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पिंजरा घेऊन दाखल झाले. परंतु गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने झाडावर चढलेला बिबट्याने मात्र समोरील उसाच्या शेतात पळ काढला.

घाबरू नका… गावात दवंडी
त्यानंतर देसाई यांनी सारोळा बुद्रुक गावात जाऊन दवंडी दिली. ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे आवाहन करत कोणीही घाबरून न जाता आजच्या दिवस शेतात कोणीही काम करण्यास जाऊ नये असे आवाहन केले. मात्र शेती कामाचे दिवस असल्याने शेतकर्‍यांचे शेतात निंदणी, कोळपणी व कपाशी पिकाची वखरणी करण्याचे काम चालू असल्याने शेतकर्‍यांपुढे मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेजारीच संतोष पाटील यांचा उसाचा शेत असल्याने त्याच्यातून सारोळा शिवार मार्गे मोढाळा गावाकडे या बिबट्याने पळ काढला असून वनविभाग बिबट्याच्या मागावर आहे. कोणालाही बिबट्या आढळून आल्यास वनविभागाशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी देसाई यांनी केले आहे.