पाचोरा येथे औद्योगिक वसाहत मंजूर

0

आमदार किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पाचोरा(प्रतिनिधी) नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील कोठली शिवारातील सूतगिरणीच्या जागेत औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) ला मंजुरी मिळाल्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना प्राप्त झाले असून औद्योगिक वसाहतीसाठी लागणारे जमीन भूसंपादनासाठी भूसंपादन आधिकारी म्हणून पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाचोरा मतदारसंघाच्या सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल अशा ह्या औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीमुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील युवक बेरोजगारांना रोजगारासाठी करावी लागणारी भटकंती तर थांबणारच आहे. परंतु मतदारसंघातील कापूस, मक्का व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या मालावर या औद्योगिक वसाहतीत प्रकल्प राबविले जाणार असल्याने शेतकर्‍यांच्या पिकालाही हमीभाव मिळणार असल्याची ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जिल्हा परिषदेचे सदस्य दिपकसिंग राजपूत, पदमसिंह पाटील, सेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, सेनेचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अ‍ॅड. दिनकर देवरे, भरत खंडेलवाल, चंद्रकांत धनवडे, नगरसेवक वाल्मिक पाटील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की मतदारसंघात औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीचा प्रश्न मार्गी लागणार अशी आमच्याकडून गेल्या २ वर्षांपासून चर्चा असताना विरोधक व काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अखेर मंजुरीचे आदेश जिल्हा अधिकारी कार्यलया पर्यंत आल्याने अखेर मतदारसंघ वासीयांसाठी तो आनंदाचा दिवस उगवला असून जळगाव शहराव्यतिरिक्त व माजी आमदार राजीव देशमुख यांनी मंजूर केलेल्या औद्योगिक वसाहत वगळता जळगाव जिल्ह्यात केवळ जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात आणि पाचोरा मतदारसंघात औद्योगिक वसाहत मंजूर झाली आहे. सन २०१४ मध्ये निवडून आल्यानंतर केंद्रीय मंत्री ना. सुभाष देसाई यांना प्रस्ताव सादर करून सतत ना. देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. अखेर मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वाद व सहकार्याने औद्योगिक वसाहतीस मंजुरी मिळाल्याने आजचा दिवस हा माझ्यासाठी व मतदारसंघातील नागरिकांसाठी आनंदाचा दिवस आहे.


अशी असणार औद्योगिक वसाहतीची रचना
नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ कोठली ग्रामपंचायतीची ८० हेक्टर गावठाण जागा असून याच ठिकाणी सुतगीरणीची ५२ हेक्टर जागा असून परिसरातील काही जमीन संपादित केली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक असणार्‍या दळण वळणाचे मुख्य साधन नगरदेवळा रेल्वे स्टेशन असून रेल्वे स्टेशन जवळच नॅशनल हायवेचे काम सुरू आहे. या शिवाय याच ठिकाणी नुकतेच १३२ के.व्ही चे सबस्टेशन चे काम पूर्ण झाले आहे. या व्यतिरिक्त जवळूनच गिरनेचा( कॅनॉल) पाटचारी जात असल्याने वीज, पाणी ,जमीन व दळण वळणाच्या साधनांचा प्रश्नही मिटलेला आहे. पाचोरा मतदारसंघात कापूस, मक्का व केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. मात्र शेतकर्‍यांच्या शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील सूतगिरण्या, साखर कारखाने व स्टार्च फॅक्टरी ही बंद पडल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने दुर्दशा झाली आहे. या औद्योगिक वसाहतीत शेतीमलावर प्रक्रिया करणार्‍या वस्तु तयार होणार असल्याने शेतकर्‍याला सुगीचे दिवस तर येतीलच परंतु मतदारसंघातील पदवीधर व उच्चसुशिक्षित बेरोजगार पदवी घेऊन उदरनिर्वाह साठी परराज्यात भटकंती करतात. या वसाहतीमुळे मतदारसंघातील बेरोजगारीची समस्या सुटणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.