विकासकामांना विरोध ही वाघ कुटूंबियांची परंपरा

0

माजी आ. दिलीप वाघ यांना आमदार किशोर पाटील यांचे प्रत्युत्तर

पाचोरा(प्रतिनिधी) – पाचोरा मतदारसंघात सत्ताधारी आमदार कामे करत असेल तर त्याला विरोध करण्याची वाघ कुटुंबियात परंपरा ही खानदानीच असून हा विषयी मतदारसंघातील जनतेला ज्ञात आहे. माजी मंत्री कै. के.एम.बापू पाटील हे जेव्हा सत्तेवर येऊन बहुळा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तेव्हा यांनी शिंगाडे मोर्चे काढून या प्रकल्पाला विरोध दर्शवीला. मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यांनीच उद्घाटन केले. हे ही जनतेला ज्ञात असून सध्या जनतेत जाऊन सांगण्यासारखे काही शिल्लक न राहिल्याने दिलीप वाघ हे पत्रकार परिषदेत विकासकामांना विरोध करून जनतेसमोर जाण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हापरिषद सदस्य पदमसिंह पाटील, उद्योजक मुकुंद बिलदीकर, सेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अ‍ॅड. दिनकर देवरे, स्विय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी दिलीप वाघांनी औद्योगिक वसाहतीची मंजुरीही विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणलेला फंडा असून शेतकरी व बेरोजगारांची दिशाभूल करणारा आहे. या शिवाय उतावळी, बहुळाच्या पाण्याचे वाघूर प्रकल्प आणि क्रीडा संकुलनाचे काय झाले ? असे प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना आमदार पाटलांनी सांगितले की, क्रीडासंकुलाचा प्रश्न हा त्यांच्याच काळातील असून क्रीडासंकुलाची जागा त्यांनी शिक्षण संस्थेच्या नावावर हडपण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. जामनेर पासून पाचोर्‍याचा भाग उंचावर असल्याने ते पाणी आणणे शक्य नाही. उतावळीचे पाणी बहुळात सोडण्यासाठी डीपीडीसीच्या बैठकीत ३० कोटी पैकी १८ कोटी मंजूर करण्यात आले आहे. उतावळी ऐवजी थेट गिरणेतून पाईपलाईन द्वारे पाचोरा भडगावसाठी पाणी आणण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.


बोललो ते करून दाखविले
पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी २६ रोजी लोकशाही महोत्सवाचे आयोजन करून वाघ व मला आमनेसामने बोलविले होते. त्या वेळी दिलीप वाघांनी एमआयडीसीच्या मंजुरी बाबत प्रश्न विचारला होता. मी त्याच वेळी सहा महिन्यात एमआयडीसी आणतो असे सांगितले होते. त्या प्रमाणेच एमआयडीसीला मंजूरी मिळुन भूसंपादन अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांची नियुक्ति ही करण्यात आली आहे. राज्य शासनांच्या पत्रात सुतगीरणीची ११९.१२ हेक्टर व खासगी क्षेत्राची ७८.७३ हेक्टर जागा मिळाली असून याबाबत संबंधित शेतकर्‍यांनी होकार दिला आहे. जमीन भूसंपादन नंतर रस्ते, पाणी, गटारी, वीज ही कामे होऊन औद्योगिक वसाहतीच्या कामासाठी २ वर्षाचा कालावधी लागणार आहे. मला नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने मी ७५०ते ८०० कोटींची विकास कामे केल्याचे ठासून सांगत आहे. मात्र वाघांनी ५ वर्ष आमदारकी भोगून मतदारसंघाला २५ वर्ष मागे नेल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.