‘पॅडमॅन’नंतर आता ‘फर्स्ट पिरीयड’

0

नवी दिल्ली-सामाजिक भान ठेवून समाजात होणा-या प्रत्येक विषयावर ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या अभिनयाबरोबरच लेखनशैलीमुळेही चर्चेत असते. त्यातच तिने आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ट्विंकलने ‘पॅडमॅन’ या चित्रपटाची यशस्वी निर्मिती करुन स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. पॅडमॅननंतर ट्विंकल याच आशयाला धरुन आणखी एक लघुपट तयार केला आहे. या लघुपटामध्येही मासिक पाळीवर भाष्य करण्यात आले असून ‘फर्स्ट पिरीयड’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

२८ रोजी प्रदर्शित

हा लघुपट मासिक पाळी दिनाच्या दिवशी म्हणजेच २८ मे रोजी प्रदर्शित झाला. फर्स्ट पिरीअड प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच त्याला १६ हजारपेक्षा अधिक व्ह्युज मिळाल्याचे सांगण्यात आले.

”फर्स्ट पिरीयड’ च्या निर्मितीची जबाबदारी मोजेज सिंह यांनी उचलली तर हा लघुपट सर्व स्तरावर पोहोचवण्यासाठी ट्विंकलने मदत केली आहे. मोजेस सिंह यांनी २०१६ मध्ये अशाच धरतीचा ‘जुबान’ हा चित्रपट तयार केला होता. मासिक पाळी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. हा संवेदनशील विषय योग्यरितीने समाजासमोर यावा यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून समाजात स्त्रियांचे महत्व ओळखून त्यांना प्रतिष्ठेचे स्थान मिळावे यासाठीच हा प्रयत्न करण्यात आला आहे, असे मोजेस सिंह यांनी सांगितले. तसेच ट्विंकलने या पूर्वी हा विषय हाताळल्यामुळे तिच्याशी याविषयावर चर्चा केल्यानंतर हा लघुपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे मोजेज यांनी सांगितले.