परिचारकास मारहाण प्रकरणी परस्परांवरील गुन्हे मागे

0

ना. गिरीश महाजनांची मध्यस्थी : पहूर ग्रामीण रुग्णालयाची सेवा पुर्ववत सुरू

पहूर, ता . जामनेर ( वार्ताहर ) पहूर ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान अधिपरिचारिकास झालेल्या मारहाणप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने परस्परांवरील गुन्हे मागे घेण्यात आले असुन वैद्यकीय सेवा पुर्ववत सुरू झाली आहे.
पहूर ग्रामीण रूग्णालयास नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पट्टनशेट्टी यांनी भेट देवून वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांना कामबंद आंदोलन मागे घेऊन आरोग्य सेवा पुर्ववत सुरू करण्याच्या सुचना केल्या होत्या. परंतू वैदयकिय अधिकारी व कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू ठेवल्याने वैदयकिय सेवा ठप्प होती. दरम्यान राज्य आरोग्य सेवा परिचारक संघटनेच्या राज्य कोषाध्यक्षा सुरेखा लष्करे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी भेट देवून झालेल्या घटनेची माहीती समजून घेतली. जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या समन्वयातून रुग्णसेवा सुरळीत सुरू करण्यासाठी संबधितांनी परस्परांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सुचना केल्या. जनतेच्या हितासाठी या प्रकरणावर तोडगा निघावा या हेतूने अधिपरिचारक आबादेव कराड यांनी मारहाणीचा तसेच सुरेखा दिपक मोहाळे ( रा. वाकोद ) या महिलेने दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यात आला. पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या समक्ष परस्परावरील गुन्हे मागे घेतल्याने प्रकरणावर पडदा पडला.

पाच रुग्णांवर झाले उपचार
रुग्णसेवा सुरू होताच रुग्णालयात आलेल्या पाच रुग्णांवर वैद्यकिय अधिकारी , कर्मचार्‍यांनी उपचार केले . यामुळे सर्वसामान्य नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. याप्रसंगी परिचारक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा माया सोलंकी, सदस्या छाया पाटील, किशोर चौधरी, विकास धनगर, विनय ढाकणे, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, डॉ. हर्षल महाजन, डॉ. मंजूषा पाटील, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, आरोग्यदूत अरविंद देशमुख, रामेश्वर पाटील, संजय देशमुख, पत्रकार मनोज जोशी, शरद बेलपत्रे, रवींद्र घोलप, रवींद्र लाठे, शंकर भामेरे, गणेश पांढरे यांनी समन्वयाच्या भूमीकेतून रुग्णसेवा सुरळीत होण्यासाठी पुढाकार घेतला.