वैदयकीय अधिकार्‍यांनी दिले राजीनामे

0

मारहाणीच्या निषेधार्थ पहूर ग्रामीण रुग्णालयाचे कामबंद आंदोलन

पहूर , ता . जामनेर ( वार्ताहर ) – येथील ग्रामीण रुग्णालयात आधिपरिचारकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी वैदयकिय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करीत दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजीनामे दिले. या आंदोलनामुळे रूग्णांचे मात्र हाल झाले. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ .एन. एस.चव्हाण यांनी रुग्णालयास भेट देवून घटनेची माहीती घेतली.
केवडेश्वर महादेव मंदीराच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत काल पाच महिला जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचारादरम्यान जि.प.सदस्य अमित देशमुख अधिपरीचारक आबादेव कराड यांच्यात वाद होवून हाणामारी झाल्याने पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने बाह्य रुग्णसेवा ठप्प झाली. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली .

जिल्हा शल्यचिकीत्सकांकडून पाहणी
सकाळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ .एन.एस. चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली. तर रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डॉ. हर्षल महाजन व डॉ. मंजूषा पाटील यांनी राजीनामे दिले. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलन चालूच राहील असे कर्मचार्‍यांनी सांगीतले. सध्या डॉ. हर्षल चांदा यांच्याकडे पहूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी पदभार आहे. त्यांच्याकडे जामनेर व बोदवडचाही प्रभारी पदभार असल्याने पहूरच्या रुग्णांची गैरसोय होणार आहे.दरम्यान अधिपरिचारक कराड यांच्यावरही जळगांवला उपचार सुरू आहेत. तथापी त्यांच्या विरूद्ध पहूर पोलीसात विनयभंग, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनतेने व कर्मचार्‍यांनी शांततेने प्रश्न समजून घ्यावा. दवाखान्याच्या व रूग्णांच्या हितासाठी पुढे येण्याची गरज आहे. घडलेल्या घटनेची दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ .एन.एस. चव्हाण
जिल्हा शल्यचिकित्सक