युनोकडून पाकिस्तानला झटका; मध्यस्थी करण्यास नकार !

0

जिनिव्हा: कलम ३७० रद्द झाल्यानंतर भारताविरोधात पाकिस्तानने जगभरात अपप्रचार सुरु केला. मात्र काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात पाकिस्तानला अपयश आले. संयुक्त राष्ट्राने आता पाकिस्तानला दणका दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा विषय असल्याने दोन्ही देशाने चर्चेने हा विषय सोडवावा असा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे. यूएनचे सेक्रेटरी जनरलचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मध्यस्थेबाबतची आमची भूमिका कायम आहे. त्यात काही बदल होणार नाही. तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाने दोन्ही देशांच्या सरकारशी संपर्कही साधला आहे, असं दुजारिक यांनी स्पष्ट केलं.

दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत आणि चर्चेने सोडवावा. दोन्ही देशांना काश्मीरवर शांततेनेच तोडगा काढावा लागेल, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय मुद्दा असून त्यात मध्यस्थी करण्याची तिसऱ्या पक्षाची गरज नसल्याचं भारताने यापूर्वीच ठणकावून सांगितलं आहे. त्यातच आता संयुक्त राष्ट्र संघानेही त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.