पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर शहरात बुधवारी रात्री झालेल्या एका निवडणूक बैठकीत आत्मघातकी स्फोट घडविण्यात आले. या स्फोटात अवामी नॅशनल पार्टीचा नेता हारुन बिल्लौरसहीत कमीत कमी चार लोक ठार झालेत. आत्मघातकी हल्लेखोराने केलेल्या या हल्ल्यात तब्बल १४ जणांनी आपले प्राण गमावले आहे. याशिवाय जवळपास ६५ लोक जखमी झालेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आले.
स्फोट झाला तेव्हा बिल्लौर आणि एएनपीचे कार्यकर्ते पार्टीच्या एका बैठकीसाठी एकत्र जमले होते. बिल्लौर मंचाजवळ पोहचले तेव्हा फटाकेही फोडले जात होते. तेव्हाच एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला स्फोटात उडवून दिलं. या हल्ल्यात बिल्लौर गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उल्लेखनीय म्हणजे, बिल्लौर यांचे वडील तसंच एएनपीचे ज्येष्ठ नेते बशीर अहमद बिल्लौर हेदेखील २०१२ मध्ये एका आत्मघाती हल्ल्यात मारले गेले होते. २०१२ मध्ये पेशावरच्या एका बैठकीदरम्यान तालिबान हल्लेखोरांनी हा आत्मघाती हल्ला घडवून आणला होता. पाकिस्तानात निवडणुका सभांदरम्यान स्फोटाची ही काही पहिलीच घटना नाही. डिसेंबर २००७ मध्ये एका निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचीदेखील हत्या करण्यात आली होती.