काश्मीर प्रश्नावर पाकची उच्चस्तरीय बैठक; मोठ्या निर्णयाची शक्यता !

0

इस्लामाबाद: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला असलेला विशेषाधिकार कलम ३७० रद्द करून काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानची तिळपापड झाली आहे. काश्मीर प्रकरणावरुन सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारकडून उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सध्या पाकिस्तानात सुरु आहे. या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा होणार आहे. या बैठकीवर भारताची करडी नजर असणार आहे कारण यामध्ये पाकिस्तानची पुढील रणनीती काय असेल यावर निर्णय होणार आहे.

या बैठकीत पाकिस्तानकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तान तोंडघशी पडलं. त्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ही महत्वपूर्ण बैठक बोलविली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर मुद्दा घेऊन जाण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. मात्र चीन सोडून कोणत्याही देशाने पाकिस्तानला समर्थन दिलं नाही. त्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी ही बैठक महत्वाची आहे. या बैठकीत पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.