पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची उल्लंघन; जवान शहीद

0

नवी दिल्ली-पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात शस्त्रसंधीच्या उल्लंघन झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या ताज्या गोळीबारात एक बीएसएफ जवान शहीद झाला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा सेक्टर या भागात शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी रेंजर्सकडून अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

मात्र, कारवाईदरम्यान एका बीएसएफ जवानाला सर्वोच्च बलिदान द्यावे लागले. त्याचबरोबर दोन नागरिक यात जखमी झाले असून आंतरराष्ट्रीय सीमेच्या ३ किमीच्या त्रिज्येच्या परिसरातील शाळांना स्थानिक प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना कालच घडली होती. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तुफान गोळीबार केला होता. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. दरम्यान, मंगळवारीही सांबामध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला होता.