पाळधी वळण रस्त्याजवळील घटना : जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार
जळगाव- एरंडोल जाणार्या झायलो गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात गाडीच्या विरुध्द दिशेने सात ते आठ पलटी खात याचवेळी जळगावकडे जाणार्या मोटार सायकल स्वार धडकल्याची घटना रविवारी, १२ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, अपघातात रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांची बहीण स्नेहजा प्रेमानंद रुपवते ऊर्फ सुलुताई (६५) यांचा मृत्यू झाला आहे. कारचालकांसह तीन जणांना जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी महामार्गावर वाहतूक २० मिनिटे विस्कळीत झाल्याचे चित्र होते.
जळगावहून एरंडोल जाणारी झायलो (क्र. एम.एच. ४६ पी ९०५८) ही पाळधी वळण रस्त्यावर आल्यावर गाडीचे मागील दोन्ही टायर फुटून गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने महामार्गावर सात ते आठ पलटी खाऊन त्यातील सात जण जखमी झाले. यावेळी गाडीने एरंडोलहून जळगावकडे जाणार्या मोटारसायकल (क्र. एमएच १९१ बीडब्ल्यू ६८४५) ला जोरदार धडक दिल्याने तोही रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. झायलो गाडी मुंबईकडे जात होती. तिने सात ते आठ पलट्या मारल्यामुळे गाडीचे तोंड विरुध्द दिशेेने जळगावकडे झाले. गाडी रस्त्यापासून ५० ते ६० फुटापर्यंत पलटी झाल्याचे घटनास्थळी चित्र होते. मोटारसायकल स्वारही तेवढ्याच लांब फेकला गेला.
गाडीतील प्रवासी माजी आ. शिरीष चौधरी यांचे नातेवाईक
अपघात झाला त्यावेळी एरंडोल येथील कृष्णा हॉटेलचे मालक कृष्णा ठाकरे हे आपल्या गाडीने जळगावकडे जात होते. त्यांनी आपल्या गाडीतील लोकांना तेथेच उतरवून जखमींना जळगावला हलविले. त्याचवेळी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या रुग्णवाहिकेने इतर जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले. गाडीतील प्रवासी हे रावेरचे माजी आ. शिरीष चौधरी यांचे नातेवाईक असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली.
अनेकांचे जखमींना वाचविण्यासाठी मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक हेमंत नारखेडे , मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, राष्ट्रवादीचे मधुकर पाटील व पाळधीतील ग्रामस्थांनी धाव घेवून मदतकार्य करुन जखमींना दवाखान्यात रवाना केले. पाळधी दूरक्षेत्रचे हे.काँ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सहकार्यांसोबत धाव घेवून मदतकार्य सुरू केले. जखमींना जळगाव येथील दवाखान्यात पोहचविण्यास मदत केली.
खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार
या अपघातात जखमी झालेले झायलो गाडीचे चालक अशफाक, माजी आ. शिरीष चौधरी यांची भाची बंधमुक्ता व उत्कर्षा रूपवते, जावाई प्रशांत, स्नेहजा रूपवते यांचे नातु साहस व नात उमेद हे जखमी झाले असुन त्यांच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
लोकप्रतिनीधींची रूग्णालयात गर्दी
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, आ. राजूमामा भोळे, शिवसेनेचे नगरसेवक विष्णू भंगाळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक आर.जी.पाटील, माजी आ. रमेश विठ्ठल चौधरी, राज्याचे माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील, डॉ. वर्षा पाटील, वासंती चौधरी, नितीन बरडे यांच्यासह लोकप्रतिनीधींनी रूग्णालयात धाव घेऊन माजी आ. शिरीष चौधरी यांची भेट घेऊन विचारपूस केली.