पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा

0

विजय पाटील
पाचोरा: विद्यमान आमदार किशोर पाटील यांना नेतृत्वाची संधी देत मतदारांनी पुन्हा कौल दिला असला तरी त्यांच्या अल्प मताधिक्याने विजयावर विरजण पडल्याचे चित्र आहे.निकालाबाबत जी भाकिते अंदाज वर्तवले जात होते त्या सर्वांवर पाणी फिरवणारा हा निकाल मानला जात असून शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल आहे तसेच निवडणुकीदरम्यान झालेल्या आर्थिक घडामिडींमुळे मतदार संघात नवीन प्रघात निर्माण करणारा ठरला आहे.

विद्यमान आमदार किशोर पाटील हे सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले चौथे आमदार ठरले असून यापूर्वी कै.माजी आमदार ओंकार वाघ ,कै. माजी आमदार सुपडू पाटील कै.माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील हे सलग दोनवेळा पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडून आले होले होते. आता या पंक्तीत आता आ.किशोर पाटील यांच्या नावाची भर पडली आहे.

पाचोरा मतदार संघात पूर्वी माजी मंत्री के.एम. (बापू ) पाटील व ओंकारअप्पा वाघ यांना जनतेने आलटून पालटुन कौल दिला होता. सतत चाळीस वर्ष दोघांमध्येच पाचोरा मतदार संघाची लढत रंगत गेली होती. विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी गेल्या पाच वर्षात आठ कोटीची विकास कामे केली असल्याचा दावा केला होता. परंतु मतदारांपर्यंत विकास कामांचा दावा पटवून देण्यात ते कमी पडले. त्यांना बंडखोर उमेदवार अमोल शिंदे या अपक्ष उमेदवाराने आव्हान निर्माण केले होते. या निकालाची स्थिती राजकीय क्षेत्रातील शिवसेनेला आत्मचिंतन करण्यासारखे असल्याची मते राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघात सात उमेदवार असले तरी युतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार किशोर पाटील आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ हे मागे पडल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी शेवटच्या फेरी पर्यंत अत्यंत चुरशीची लढत दिली. तिघां प्रमुख उमेदवारांनी जोरदार प्रचार केल्याने ही निवडणूक सर्वार्थाने रंगतदार ठरली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिघांकडून विजयाचा दावा केला गेला. वंचित आघाडीचे नरेश पाटील यांनी सुमारे 3000 हजार मते घेतल्याने दिलीप वाघ यांना अडचणीत आणले. अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी मारलेली चौफेर मुसंडी आणि मिळवलेली मते विक्रमी व ऐतिहासिक ठरली विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाणारे भडगाव तालुका व शहर यात अमोल शिंदे यांनी नियोजनबद्धरीत्या प्रचार करत या भागातील सर्वच मतदान केंद्रात व चौफेर आघाडी घेतली. हा प्रकार शिवसेनेला आत्मचिंतन लावणारा ठरला आहे. पाचोरा शहरातूनही अमोल शिंदे व दिलीप वाघ यांना मताधिक्य मिळेल असा अंदाज होता. मात्र तोही खोटा निघाला शहरवासीयांनी किशोर पाटील यांना विरोध न दर्शवता उलट पसंती दिल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. तालुक्यातील नगरदेवळा, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या मोठ्या गावांमध्ये अमोल शिंदे यांनी मताधिक्य घेतले. त्यामुळे ते किशोर पाटील यांच्या बरोबरीने दुसर्‍या क्रमांकावर राहिले शेवटच्या क्षणापर्यंत अमोल शिंदे यांच्या विजयाचा दावा अत्यंत निर्धाराने केला जात होता. विजयी मिरवणुकीची देखील तयारी देखील होती. मात्र पाचोरा शहरात त्यांना अपेक्षित मते न मिळाल्याने आमदार किशोर पाटील यांचा टपाली मते मिळून 2084 मतांनी त्यांचा निसटता विजय झाला. भडगाव तालुक्याने मारले पण पाचोरा शहराने तारले अशी किशोर पाटील यांची अवस्था स्पष्ट झाली आमदार किशोर पाटील यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली असली तरी त्यांना पुढील काळात सतत दक्ष राहून सजगतेने विकासाची वाट प्रशस्त करावी लागेल.