तबलावादक ‘पंडित लच्छू महाराज’ यांना गूगलकडून डुडलद्वारे आदरांजली

0

मुंबई – बनारस घराण्याचे तबलावादक ‘पंडित लच्छू महाराज’ यांच्या जन्मदिवसानिमित्त आज गुगलने डुडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली. १६ ऑक्टोबर १९४४ ला जन्मलेल्या लच्छू महाराजांचा बॉलीवुडचे आवडते तबलावादक म्हणून लौकिक होता. त्यांचे नाव ‘लक्ष्मण नारायण सिंह’ असे होते. मात्र, त्यांना ‘लच्छू महाराज’ याच नावाने ओळखले जाते.

वडिलांच्या प्रेरणेने लहान वयातच लच्छू महाराजांनी संगिताची साधना सुरू केली. त्यांचे वडील हेच त्यांचे पहिले गुरु. बनारस घराण्यातील तबल्याचा लौकिक अनेक पिढ्यांचा होताच. लच्छू महाराजांनी त्या लौकिकाला साजेसा कलावंत स्वतःच्यात जपला. ‘जातिवंत कलावंताला रसिकांनी टाळ्या वाजवून दिलेली दाद हाच खरा पुरस्कार असतो, असे सांगून त्यांनी केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ हा किताब नाकारला. बारा भावंडांपैकी एक असणाऱ्या लच्छू महाराजांनी आपल्या घराण्याची कीर्ती वाढविली.

अखेरच्या दिवसांतही तब्येत ठीक नसतानाही लच्छू महाराजांनी संगीताच्या साधनेत खंड पडू दिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविणेही सुरूच ठेवले. कोणत्याही गोष्टीचा हव्यास न धरता साधेपणाने जीवन जगत राहिले. त्यांनी तबल्याची साथ धरली आणि तबल्यानेही त्यांना शेवटपर्यंत साथ दिली, हीच त्यांच्या महानतेची खूण आहे. २८ जुलै २०१६मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने वाराणसी येथे ७३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.