जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांकडून कौतुकाची थाप

0

गाण्याच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश
सोनाळेच्या तरूणासह जळगावच्या गृपची जनजागृती

जळगाव:- पाणी टंचाईचे चटके, पाण्यासाठी होणारी वणवण, आटलेले स्त्रोत, हे वास्तव व दुष्काळाची भीषणता जर आपल्याला बदलायची असेल तर पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे. अशा स्थितीत पाणी वाचविण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे अत्यावश्यक बनले आहे. या स्थितीत आपल्या अंगातील कौशल्याचा वापर करून जामनेर तालुक्यातील सोनाळे येथील तरूण चंद्रकांत इंगळे व जळगावच्या स्वराज्य पथनाट्य गृपने गाण्याच्या माध्यमातून पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीची मोहीम हाती घेतली. चंद्रकांत इंगळे यांनी लिहिलेले व गायीलेले ‘पाण्याचा जपून वापर कर’ हे गाण युट्युबवर गाजत असून या गाण्याच्या माध्यमातून या टीमने पाणी बचतीचा उत्तम संदेश दिला आहे. त्यांच्या कार्याची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेऊन चंद्रकांत इंगळे यांचा नुकताच सत्कारही केला आहे.

गाण्याची गोष्ट
गेल्या वर्षी शासनाच्या जलजागृती सप्ताहात पथनाट्यातून जलसाक्षरता व्हावी, म्हणून पाण्याचा जपून वापर कर हे गीत लिहिण्यात आले होते. पथनाट्यात हे गीत लोकांना आवडू लागले. स्वराज्य पथनाट्य गृपच्या कलाकार मित्रांनी हे गीत जनतेपर्यंत पोहचावे, यातून जनजागृती होईल, म्हणून हे गाण व्हिडिओ स्वरूपात तयार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार चंद्रकांत यांना गृपमधील अश्‍विन सुरवाडे व वैभव तराळ या दोनही मित्रांनी निर्मितीसाठी सहाय्य केले. भारत वाळके यांनी धरगणाव, पाचोरा, जळगाव, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर या तालुक्यात एका दिवसात गाण्याला साजेशे फुटेज मिळविले. या चित्रिकरणादरम्यान टीमला पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. ही दाहकता त्यांनी त्यावेळी कॅमेरात कैद केली होती.

पाणी बचतीला पर्याय नाही
पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. त्यासाठी झाडे -लावणे झाडे जगवणे, रेन वॉटर हार्वेस्टींग हे उत्तम पर्याय आहेत, असा संदेश तातडीने लोकांपर्यंत पोहचावा, जलसाक्षरता व्हावी, असा सार्थ हेतू या गाण्यामागे असल्याचे चंद्रकांत इंगळे सांगतात. या गाण्यामागे कुठलाही व्यावसायिक दृष्टीकोण नसून केवळ जनजागृती हा या गाण्या मागचा मुख्य उद्देश असल्याचे चंद्रकांत इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, हे गाणे संध्या महाराष्ट्रभर गाजत असून याची दखल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली. त्यांनी चंद्रकांत इंगळे व गृपचे कौतुक केले असून त्यांच्या संपर्क कार्यालयात चंद्रकांत इंगळे यांचा सत्कारही केला. गीताच्या निर्मितीसाठी मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी, प्रा. विजय लोहार, योगेश बोरसे, नेचर क्लब, स्वराज्य पथनाट्य गृप यांनी सहकार्य केल्याचे चंद्रकांत इंगळे यांनी सांगितले.