आधी नोकरी गेली, नंतर पीएमसी बँकेत ठेवी अडकल्याच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !

0

मुंबई: घोटाळ्यामुळे निर्बंध लादलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर आंदोलन करणाऱ्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजय गुलाटी असे या खातेदाराचे नाव असून ते ५१ वर्षांचे होते. ‘संजय आणि त्यांचे वडील दोघेही जेट एअरवेजचे माजी कर्मचारी होते. संजय यांची जेटमधील नोकरी गेली होती. पीएमसी बँकेवरील निर्बंधांमुळे त्यांची बचतही अडकली. या मोठ्या धक्क्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. बँकेवरील निर्बंधामुळे त्यांचे ९० लाख रुपये अडकले होते.

खातेदारांनी तारापोर गार्डन परिसरातील बँकेच्या शाखेसमोर निदर्शने केली, त्यात गुलाटी देखील सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर ते घरी आले आणि झोपले. झोप झाल्यानंतर त्यांनी पत्नीकडे काहीतरी खायला देण्यास सांगितले. ते खात असतानाच ते कोसळले. त्यांना यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृच घोषित केले.