नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून बँकेने आपली ई-वॉलेट सेवा ‘पीएनबी किट्टी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी या वॉलेटमधील पैसे खर्च करावेत किंवा आपल्या अकाऊंटला ट्रान्सफर करावेत असे बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
बँकेने आपण ई-वॉलेट सेवा बंद करीत असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. ३० एप्रिल २०१९पासून ‘पीएनबी किट्टी’ ही ई-वॉलेटची सेवा आम्ही बंद करीत आहोत, त्यामुळे ग्राहकांनी यातील पैसे खर्च करावेत किंवा अकाऊंटला ट्रान्सफर करावेत तसेच हे अॅप बंद करावे अशी सूचना बँकेकडून ग्राहकांना देण्यात आली होती. बँकेने दिलेली डेडलाईन आज पूर्ण होत आहे. त्यामुळे उद्यापासून या वॉलेटच्या माध्यमांतून पीएनबीच्या ग्राहकांना कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. पीएनबी किट्टी हे एक डिजिटल वॉलेट असून ग्राहकांना ऑनलाइन व्यवहारांची सेवा देते.