नवी दिल्ली-कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने सध्या भारताचे रशियातील राजदूत असलेल्या पंकज सरण यांची दोन वर्षांसाठी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नियुक्ती केली आहे. सरण २०१५ पासून रशियातील राजदूत पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. भारतीय विदेश सेवेच्या १९८२ च्या तुकडीतील अधिकारी असलेले सरण यांनी बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त पदही सांभाळले आहे. ते २००७ ते २०१२ या काळात पंतप्रधानांच्या कार्यालयात सहसचिव होते. गुप्तचर विभागाचे माजी संचालक अजित दोवल हे सध्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.