पंकजा मुंडेंचा मानस भाऊ राष्ट्रवादीत

0

बीड- मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले तसेच ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांचे मानस भाऊ रमेश कराड उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार आहे. उस्मानाबाद-लातूर-बीडचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ संपत आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी मोठी खेळी खेळत कराड यांना संधी दिली. रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र ते पराभूत झाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.