कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये सोमवारी पंचायत निवडणूक व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मोठा हिंसाचार उसळला. या झालेल्या हिंसाचारात १२ ठार तर ४३ जण जखमी झाले आहेत. राज्यात ६० हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असतानाही उसळलेला हिंसाचार रोखता आला नाही. दिवसभरात ७३ टक्के इतके मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाकडे दुपारपर्यंत हिंसाचाराशी संबंधित ५०० पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
हे देखील वाचा
सत्ता टिकवू पाहाणारी सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) ३४ टक्के जागांवर बिनविरोध विजय प्राप्त केला आहे. अशा स्थितीत हा हिंसाचार झाला आहे. गेल्या ५ वर्षांत देशात कोणत्याही राज्यात अशा हिंसक घटना दिसल्या नाहीत. याआधी प. बंगालमध्येही २०१३ मध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान २१ लोकांचा मृत्यू झाला होता.
विरोधी पक्ष तसेच अत्यंत आक्रमक बनलेला भाजपा हे पंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. राज्यातील उत्तर २४ परगणा, नादिया, दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांत झालेल्या हिंसक घटनांत तीन जण ठार झाले तर मुर्शिदाबाद येथील सुरजपूर गावात एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. सूरजपूरमध्ये हत्या करण्यात आलेला व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता होता असा दावा मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भाजप नेते सुभाष मोंडल यांनी केला आहे.