पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने ‘पार्किंग पॉलिसीला’ मंजुरी दिली आहे. पालिकेमधील सत्ताधा-यांनी गोरगरिबांवर अन्याय करत त्यांच्याकडून अव्वाचे सव्वा पाणीपट्टी दर व मिळकत दरांमधील छुपी करवाढ लादली जात आहे. त्यानंतर आता पार्किंग पॉलिसीच्या नावाखाली जीझिया कर वाहन धारकांकडून वसूल करण्यात येणार आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.
वाहनतळ उपलब्ध करून देणे पालिकेची जबाबदारी
प्रत्येक वाहनधारक हा वाहन खरेदी करते वेळीस रस्ता कर भरत असतो. त्यामुळे पालिकेचे जबाबदारी असते शहरात नागरिकांना आवश्यक तेवढे वाहनतळ उपलब्ध करून देणे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आहे त्या नियमांची अंमलबजावणी व नागरिकांमध्ये या बाबत जागरुकता निर्माण करण्याएेवजी भाजपाचे नेते आपल्या ठेकेदार कम कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी एक नवीन कुरण निर्माण करुन देत आहेत, असे आरोप सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात केले.
काँग्रेस रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल
चारचाकी वाहनासाठी वर्षाला नऊ हजारांहून जास्त कर आकारला जाणार आहे. ही रक्कम एखाद्या सदनिकेच्या किंवा व्यापारी, वाणिज्य गाळ्याच्या वार्षिक मिळकतीपेक्षा जास्त आहे. पुणे, मुंबई मनपाच्या धर्तीवर हा कर आकारला जाईल असे सांगण्यात आले. पार्किंग पॉलीसीच्या गोंडस नावाखाली जनतेकडून जीझिया कर वसूल करण्याचे काम हे प्रशासन करीत आहेत. याला शहरातील नागरिक तीव्र विरोध करतील. हा ठराव प्रशासनाने रद्द करावा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल. तसेच, वेळ प्रसंगी ‘पार्किंग पॉलीसी’ विरोधात न्यायालयात दाद मागू, असा इशारा साठे यांनी दिला आहे.