शेतकर्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : नुकसान भरपाईची मागणी
पारोळा प्रतिनिधी- पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथील शेतकरी समाधान गुलाब हाटकर, विमलबाई गुलाब हाटकर, भिकन फुलजी माळी या शेतकर्यांच्या शेताला लागून असलेल्या लेंडी नाल्याला मोठा पूर आल्याने शेतातील पिकांसह शेतचं वाहून गेल्याची घटना कामतवाडी शिवारात घडली. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असुन नुकसान भरपाईची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
याबाबत विमलबाई गुलाब हाटकर, समाधान गुलाब हाटकर यांचे कामतवाडी शिवारात शेत गट क्र५१/१ क्षेत्र ६२ आर मध्ये ५ डबे एसफोर लावलेला होता. फवारणी,युरिया, टॉनिक देऊन कापूस पीक वाढविले असताना दि.१ रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे शेता शेजारील लेंडी नाल्याला मोठा पूर आल्याने तसेच तेथे चुकीच्या ठिकाणी बांधलेल्या के टी वेअरला दोनच मोर्या असल्याने पुराचे पाणी आडल्याने हाटकर यांनी शेताच्या बांधावर टाकलेल्या १२ फुटाचा मातीचा बंधारा फोडून शेतात घुसून पीकांसह माती वाहून गेल्याने या शेतकर्यांचे पुर्ण नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून हीच परिस्थिती निर्माण होऊन नुकसान होत आहे. तरी आजपर्यंत शासनाने दमडीचीही नुकसान भरपाई दिलेली नाही. यावेळीही तलाठी,कृषी सहाय्यक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप हाटकर कुटुंबाने केला आहे. याठिकाणी कृषी सहाय्यक डी. व्ही. खोसे यांनी पाहणी करून प्राथमिक अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले. या गंभीर बाबीकडे कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी लक्ष न दिल्यास शेतातच आत्महत्या करण्यचा ईशारा हाटकर परिवाराने दिला आहे. केटी वेअर बंधारा हा चुकीच्या ठिकाणी बांधला असून त्या बंधार्याला दोनचं मोर्या असल्यामुळे हा प्रकार घडला आहे. हा बंधारा दुसरीकडे बांधावा किंवा या बंधार्याच्या मोर्या वाढवाव्यात अशी मागणी करण्यात आली. शेतीशिवाय दुसरा कुठलाही उदरनिर्वाह नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. निवेदनावर विमलबाई हाटकर, भिकन फुलजी माळी,महारु संतोष पाटील,समाधान गुलाब हाटकर, आशाबाई बापू भिल,कैलास पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.