रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात मिळणार जेवण

रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी खूप आनंदाची आहे, कारण आता रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी माफक दरात जेवण दिले जाणार आहे.मध्य रेल्वेच्या पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, भुसावळ, खंडवा व नागपूर या सहा रेल्वे स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे.

रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवासी गाड्यांच्या जनरल डब्याजवळ हे स्टॉल लावण्यात आले असून, या स्टॉलवर २० आणि ५० रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. २० रुपयांत प्रवाशांना ‘इकॉनॉमी फूड’ मिळेल. ज्यात सात पुऱ्या, बटाट्याची भाजी आणि लोणचे या पदार्थांचा समावेश आहे. तर ५० रुपयांत राजमा चावल किंवा छोले चावल, खिचडी, कुल्चे, छोले-भटुरे, पावभाजी आणि मसाला डोसा यांसारखे स्नॅक्स उपलब्ध करून दिले जात आहे.

सध्या हि सेवा मध्य रेल्वेच्या पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, भुसावळ, खंडवा व नागपूर या स्थानकांवर सुरू करण्यात आली असून लवकरच ही सेवा इतर रेल्वेस्थानकांवर सुरू केली जाईल. असेही रेल्वे विभागाने म्हटले आहे.