पतंजलीने लाँच केले व्हॉटसअॅपप्रमाणे मेसेजिंग अॅप

0

नवी दिल्ली-योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलिने नुकतेच एक अॅप्लिकेशनही लाँच केले आहे. आता पतंजलिकडून अॅप्लिकेशन लाँच कऱण्यात आल्याने त्याबाबत बरीच उत्सुकता आहे. ‘किंभो’ असे नाव असलेले हे अॅप्लिकेशन स्वदेशी मेसेजिंग अॅप आहे. सध्या बाजारात असलेल्या व्हॉटसअॅप या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनला टक्कर देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे.

काय आहे ‘किंभो’ चा अर्थ?
‘किंभो’ याचा संस्कृत अर्थ आहे एखाद्याची चौकशी किंवा विचारपूस करणे. याचा अर्थ इंग्रजीमधील हॅलो, हाऊ आर यु किंवा व्हॉटस अप यासारखाच आहे. पतंजलिच्या प्रवक्त्यांनी याबाबत एक ट्विट करत या शब्दाचा हिंदीतून अर्थ सांगितला आहे. यामध्ये त्यांनी आता भारत बोलेल किंभो, भारत विचारेल किंभो असेही लिहीले आहे. हे अॅप्लिकेशन भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केले आहे असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप्लिकेशन उपलब्ध असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. मात्र त्याच्या माध्यमातून मेसेज करणे आणि स्वीकारणे काहीसे कठिण जात असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

पतंजलि समूहाने आपल्या या अॅप्लिकेशनबद्दल गुगल प्ले स्टोअरमध्ये काही माहिती दिली आहे. ते म्हणतात, या अॅप्लिकेशनद्वारे वैयक्तिक आणि ग्रुप चॅटींग करता येणार आहे. त्याबरोबरच एकमेकांना मेसेजबरोबरच फोटो, व्हिडियो, ऑडियो, जीआयएफ फाईल, स्टीकर्स, लोकेशन पाठवणे सहज शक्य होणार आहे. मात्र सध्या हे अॅप्लिकेशन वापरण्यात अडचणी येत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर या अॅपबाबत जोरदार चर्चा सुरु असून आता पतंजली आणखी कोणत्या क्षेत्रात प्रवेश करणार याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.