पीडीपीच्या माजी नेत्याची गोळ्या घालून हत्या

0

हत्या करून दहशतवादी पळाले, पुलवामातील घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) माजी नेते गुलाम नबी पटेल यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पुलवामा येथील राजापोरा येथे दहशतवाद्यांनी पटेल यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले होते. जखमी अवस्थेत पटेल यांना रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला. राजपोरा चौकात हा हल्ला झाला, त्यात इम्तियाज अहमद आणि बिलाल अहमद मिर हे दोघे खासगी अंगरक्षक जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

दोन अंगरक्षकही गंभीर जखमी
पोलिसांनी सांगितले की, पटेल यांच्यावर गोळ्या झाडणारे हे दहशतवादी होते. या हल्ल्यात त्यांचे दोन अंगरक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. गुलाब नबी पटेल यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे अंगरक्षक इम्तियाज अहमद झरगर आणि बिलाल अहमत मीर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील प्रत्यदर्शींनी सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील शादीमार्ग गावातील रहिवासी गुलाम नबी पटेल हे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीतून जात असताना राजपोरा चौकात त्यांच्या गाडीवर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पटेल व त्यांचे दोन अंगरक्षक जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

1991मध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. मुफ्ती म्हणाल्या ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यानंतर ते सत्ताधारी पक्षात वरिष्ठ नेते म्हणून सक्रिय झाले होते. पटेल यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. खोर्‍यातील आणखी एक कुटुंब उद्ध्वस्त झाले, असे मुफ्ती म्हणाल्या. पोलिस सूत्रांनी सांगितले की, पटेल हे सुरूवातीस राज्याच्या आरोग्य विभागात काम करत होते. त्यांनी 1991मध्ये काँगे्रस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पीडीपीत प्रवेश केला होता.